Ravindra Jadeja Post: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्यापासून या चर्चांना सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला कसोटी मालिकेत 1-3 असा पराभव स्विकारावा लागला होता. मालिकेतील या दारूण पराभवानंतर भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू निवृत्ती स्विकारू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच आता रवींद जडेजाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबतचे संकेत दिले होते.
रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने एकही अर्धशतकीय खेळी केली नाही. गोलंदाजीमध्येही त्याला चांगली करता आली नव्हती. 3 सामन्यात त्याने केवळ 4 विकेट्स आणि 27 च्या सरासरीने 135 धावा केल्या.
रविंद्र जडेजाने याआधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो केवळ भारतीय संघाकडून कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळतो. मात्र, आता लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.
Ravindra Jadeja’s Instagram story. 🌟🇮🇳 pic.twitter.com/vacB7do0HB
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 10, 2025
जडेजाने इंस्टाग्रामवर त्याच्या कसोटी जर्सीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये जडेजाचा जर्सी क्रमांक देखील दिसत आहे. या स्टोरीनंतर जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याच्याकडून अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, रिपोर्टनुसार पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाच्या घोषणा केली जाणार आहे. या संघातून जडेजाला वगळण्यात येऊ शकते. त्याच्या जागी अक्षर पटेल आणि वाशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकते.