पुणे जिल्हा | तांबडे मळा मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सांभाळले

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांनी समर्थपणे सांभाळले आहे. येथे मतदान सोमवार, दि. १३ रोजी शांततेत पार पडले आहे. दिव्यांगांनी मतदान केंद्र यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिव्यांग बांधवांचे कौतुक केले.
तांबडेमळा येथील मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सांभाळावे, अशी सूचना उशिरा देण्यात आली. सुरुवातीला या कर्मचाऱ्यांना ईडीसी प्रमाणपत्र मिळाले नव्हते. शेवटच्या क्षणी त्यांना हे प्रमाणपत्र मिळाल्याने मतदानाचा हक्क बजावता आला. त्यांचे प्रशिक्षण स्वतंत्रपणे घेण्यात आले.
भारत निवडणूक आयोग अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघ १९६ आंबेगाव विधानसभाअंतर्गत दिव्यांग संचलित मतदान केंद्र तांबडेमळा क्रमांक १८२ येथे चार दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्र सांभाळण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली होती. तांबडेमळा मतदान केंद्र येथे एकूण मतदान ९५९ असून केंद्राध्यक्ष शैलेंद्र चिखले यांच्या नेतृत्वाखाली मतदान अधिकारी पोपट बेंढारी, संदीप मानकर, नितीन सासवडे यांनी अतिशय समर्थपणे केंद्राची जबाबदारी पार पाडली.
राष्ट्रीय कार्य करण्याची संधी यानिमित्ताने दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळाल्याबद्दल भारत निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे दिव्यांग कर्मचारी यांनी आभार मानले. दिव्यांग कक्षात काम करण्याबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार सचिन मुंडे, डॉ. सचिन वाघ यांचे लाभले. येथे मतदान शांततेत पार पडले असून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.





