CPI Campaign: कम्युनिस्ट पक्षाचा एल्गार! शताब्दी वर्षानिमित्त देशभर ‘बदलाव जरूरी है’ अभियान; डी. राजा यांची माहिती
CPI Campaign: क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी. राजा यांची घोषणा; रामलीला मैदानावर होणार अभियानाचा समारोप.

CPI Campaign – भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) शताब्दी वर्षानिमित्त देशभरात बदलाव जरूरी है या घोषवाक्याखाली जनजागरण आणि जनआंदोलन अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रासह देशभरातील वाड्यावस्ता आणि शहरांमध्ये पदयात्रा, घरभेटी आणि जनसंवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डी. राजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार राजा यांना जाहीर झाला असून, तो स्वीकारण्यासाठी कोल्हापूरला जात असताना त्यांनी पुण्यात या पदयात्रेची घोषणा केली. महाराष्ट्रातील मुख्य पदयात्रेला ७ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डी. राजा यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे. या अभियानाचा समारोप १ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय रॅलीने होणार आहे.
संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी राजा यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. केंद्र सरकारने अच्छे दिन, दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतमालाला हमीभाव आणि इतर आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप केला. महाराष्ट्र सरकारनेही ७५ हजार सरकारी भरतीचे आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करत, रोजगाराच्या प्रश्नांऐवजी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जात असल्याची टीकाही केली.
अद्याप ठोस प्रस्ताव नाही
लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव जाहीर केलेला नसल्याचे राजा यांनी सांगितले. त्यामुळे सध्या सुरू असलेली चर्चा ही प्रामुख्याने तर्कवितर्कांवर आधारित आहे. कुटुंब नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या दक्षिणेकडील राज्यांची लोकसंख्या नियंत्रित राहिली, तर काही राज्यांत लोकसंख्या अधिक वाढली. अशा परिस्थितीत केवळ लोकसंख्या हा निकष कसा ठरणार? महिला आरक्षणाची अंमलबजावणी डिलिमिटेशन किंवा जनगणनेशी जोडू नये, अशी मागणी डी. राजा यांनी या वेळी केली.






