‘कोविड केअर सेंटर’ रिकामी!

गृह विलगीकरण वाढल्याने 5 हजार बेड्स शिल्लक
पालिकेच्या केंद्रांमध्ये फक्त साडेचार हजार बाधित
पुणे – केंद्रशासनाने गृह विलगीकरणासाठी सशर्त मुभा दिली. त्यामुळे करोनाची सौम्य लक्षणे असलेले, तसेच लक्षणे नसलेले बहुतांश बाधित घरीच उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे महापालिकेची कोविड सेंटर रिकामी पडत आहेत. त्यामुळे तब्बल पाच हजार बेड शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
जुलैमध्ये वाढलेली करोना बाधितांची संख्या लक्षात महापालिकेने घेऊन सुमारे साडेनऊ हजार बेड्सची सुविधा उभारली होती. त्यात आणखी 12 हजार बेड्स वाढवण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, सध्या एकूण 17 हजार सक्रीय बाधितांमधील अवघे साडेचार हजार बाधित पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
मागील दोन महिन्यांतील करोनाबाधितांच्या वाढीचा वेग पाहता, ऑगस्टअखेर ही संख्या 2 लाखांच्या आसपास जाण्याचा अंदाज होता. त्यामुळे बाधितांची संख्या कमी करण्यासाठी जास्तीत जास्त बाधित वेळीच शोधून त्यांना विलग ठेवण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊनही घेण्यात आला. या कालावधीत पालिकेने सुमारे 9,500 बेड्सची सुविधा उपलब्ध केली. ज्यांना घरीच विलगीकरण शक्य नाही, त्यांना या केंद्रांत ठेवले जाणार होते. यात प्रामुख्याने झोपडपट्टी भागांचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात आता ऑगस्टचा पहिला आठवडा संपल्यानंतर या कोविड केअर सेंटरमध्ये अवघे साडेचार हजार बाधित असून 5 हजार बेड्स रिकामे आहेत.
सोसायट्यांमध्ये संसर्ग वाढला?
मे आणि जूनमध्ये शहराच्या सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक बाधित सापडत होते. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्वाधिक बाधित हे सोसायट्यांच्या परिसरात सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यातील बहुतांश बाधितांकडे गृह विलगीकरणाची सुविधा असल्याने त्यांनी घरीच उपचार घेणे पसंत केले आहेत. तर, बाधितांची संख्या घटत असल्याने तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलचे बेड मिळत आहेत. हे नागरिक कोविड केअर सेंटरकडे पाठ फिरवत आहेत.





