शेतकऱ्यांना दिलासा… ! वॉटर मीटर अन् पाणीपट्टीच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती

वाघोली : हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठच्या मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्दपासून खामगावटेक-हिंगणगावपर्यंतच्या 22 गावांतील कृषिपंपांना वॉटर मीटर बसवणे आणि भरमसाठ पाणीपट्टी आकारणीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
या निर्णयाची माहिती देण्यासाठी वाडे बोल्हाई येथील बोल्हाईमाता मंदिरासमोर शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सांडपाण्यावर पाणीपट्टी न भरण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, अतिवृष्टीमुळे देशभरातील बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मेळाव्यात उच्च न्यायालयातील कृती समितीचे कामकाज पाहणारे ज्येष्ठ वकील अश्विनकुमार देवरे, मनीष केळकर आणि अंकिता बडगेरी यांचे शेतकऱ्यांतर्फे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच कुशाबा गावडे, संचालक श्रीहरी कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले. कृती समितीचे सचिव अंकुश कोतवाल यांनी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. समितीचे अध्यक्ष आमदार बापूसाहेब पठारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.





