Agriculture News : जलसंपदा मंत्र्यांनी केली मोठी घोषणा ! पाणीपट्टीसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाने पाणीपट्टीत केलेल्या दहा पट वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्याच दराने वसुली केली जाणार आहे. तसेच, कृषी पंपांसाठी सौरऊर्जेची सक्ती रद्द करण्यात आली आहे अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
कालवा सल्लागार समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यावर जागेवरच निर्णय घेतला. यावेळी मंत्री, खासदार, आमदार तसेच विविध जलसंपत्ती संस्थांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते. बैठकीदरम्यान विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच काही प्रश्नांवर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी मुंबईत अधिवेशनकाळात बैठक घेण्यात येणार आहे.
कृषी पंपांसाठी सौरऊर्जेची सक्ती रद्द
शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात असताना, पाणी उपसासाठी सौरऊर्जेची सक्ती करण्यात येत असल्याने मोठी चिंता निर्माण झाली होती. अनेक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पंप बसवतात, तसेच खोलवर गेलेल्या बोअरवेलसाठी सौरऊर्जा उपयुक्त ठरत नाही. याशिवाय, महापुराच्या वेळी सोलर पॅनेल वाहून जाण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यानंतर मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्याला सौरऊर्जा वापरण्यास सक्ती करू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





