पुणे महापालिकेत भ्रष्टाचार: कर आकारणीसाठी पैशांची मागणी, मनसेचा आंदोलनाचा इशारा

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भोगवटा पत्र मिळाल्यानंतर मिळकतीला कर आकारणी करण्यासाठी महापालिकेचे काही अधिकारी- कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, ॲड. गणेश सातपुते, अॅड. किशोर शिंदे, बाळा शेडगे, अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रशांत कनोजिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेउन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
मनसेकडून या पूर्वीही कर आकारणी विभागातील अनागोंदी कारभारा बाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून प्रशासकाडून त्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
तसेच यावेळी मनसेकडून कोथरूड येथील एका विकसकाशी आयुक्तांचे बोलणे करून दिले. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या इमारतीला भोगवटा पत्र मिळाले आहे.
या इमारतीमधील सदनिकांमध्ये नागरिकही राहायला आले आहेत. परंतु, अद्यापही येथील सदनिकांची कर आकारणी करण्यात आलेली नाही. विकसकाने सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्या मिळकतींची कर आकारणी झालेली नसल्याचे यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास् आणून देण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





