Shivaji Maharaj statue collapse : ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात कोटींचा भ्रष्टाचार’; ठाकरेंच्या आमदाराचे नारायण राणेंवर गंभीर आरोप

Shivaji Maharaj statue collapse – मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणासोबतच सामाजिक वातावरण चांगलेच तापले. ज्या पुतळ्याला उभे करून केवळ आठ महिने झाले, तो पुतळा कोसळलाच कसा? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळा डिझाईन करणारा चेतन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा नियोजन विभाग, नौसेना आणि खासदार नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुतळा बनवणाऱ्या आपटेला आत्तापर्यंत 26 लाख रुपये पोहोच झाले आहेत, म्हणजे 2.40 कोटी रुपयांच्या पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वैभव नाईक म्हणाले, शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तर जिल्हा नियोजनमधून 5 कोटी 54 लाख 35 हजार रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले आहे, असा थेट आरोप नाईकांकडून करण्यात आला आहे.





