- महागडे कॅमेरे धूळखात पडून
- वर्षभराच्या कमाईची संधी हुकली
पिंपरी – महाराष्ट्रामध्ये होणारे अनेक सण, समारंभ, उत्सव व संस्कृती या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे साधन बनल्या आहेत. देशामध्ये करोना विषाणूचा शिरकाव झाला आणि या सर्व व्यावसायिकांच्या व्यवसायाचे गणितच बिघडले. करोना विषाणूच्या शिरकाव्याने डोलारा डासळलेल्या व्यावसायिकांमध्ये छायाचित्रकारांचाही समावेश आहे. सर्व लग्न, समारंभ बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
छायाचित्रकारांसाठी हे संकट कर्दनकाळ ठरले आहे. लग्न सोहळेच बंद झाल्याने या छायाचित्रकारांचा रोजगार संपला असून कुटुंबाचा गाडा चालविताना त्यांची दमछाक होत आहे. त्यामध्येच महागडे कॅमेरे, थाटलेली दुकाने यांच्या कर्जाने छायाचित्रकारांची झोप उडाली आहे. लग्नसराई हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांच्यासाठी महत्त्वाचा काळ असतो. लग्न जुळल्यानंतर साक्षगंधापासून, हळदीचा क़ार्यक्रम, लग्न समारंभ आणि रिसेप्शनपर्यंत छायाचित्रकारांची मोठी मागण असते. मार्च ते जूनपर्यंत सुमारे 78 विवाह मुहूर्त होते.
यंदा मुहूर्त जास्त असल्याने चांगल्या व्यवसायाची सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. सध्याच्या काळात विवाहपूर्व छायाचित्रणाचा (प्री-वेडिंग शूट) मोठा ट्रेंड वाढला आहे. छायाचित्रकारांना पुढे मोजकेच कार्यक्रम मिळत असतात. मात्र लग्नसराई हा त्यांच्या कमाईच्या मुख्य काळ असतो. पंरतु करोनामुळे लग्न समारंभच ठप्प झाले आहेत. गर्दीत विषाणूच्या फैलावाचा धोका लक्षात घेता ठरविलेले सगळे विवाह रद्द करण्यात आले आहे. पर्यायाने छायाचित्रकारांच्या ऑर्डरही रद्द झाल्या आहेत.
छायाचित्रकारांना आता प्रतिक्षा 2021 ची
यावर्षी जून महिन्यापर्यंत लग्न समारंभ होतील की नाही याची शाश्वती नाही. 15 मे नंतर जरी लग्न समारंभ सुरु झाले तरी त्यासाठी नागरिक आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च व मोठे विवाह सोहळे करण्याची आशा धूसर झाली आहे. जून महिन्यानंतर पावसाळा सुरु होईल. पुढे तुळसीविवाहानंतर लग्नाचा सीझन सुरु होतो. मात्र नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये फारसे मूर्हत नाही. त्यामुळे आता लग्नासाठी थेट जानेवारी 2021 नंतरच सुरुवात होईल.
प्री वेडिंग शूट करण्यासाठी हाय लेन्स कॅमेरे लागतात. ज्या गोष्टी बाजारात नव्याने उपलब्ध होतील त्याच गोष्टी जोडप्यांना हव्या असतात. त्यामुळे या व्यवसायात मागे राहून चालत नाही. लग्नसराईमध्येच संपूर्ण वर्षाची कमाई करावी लागते. आता व्यवसायच बंद झाल्याने हे घेतलेले महागड्या कॅमेऱ्यांचे काय करायचे असा प्रश्न पडला आहे. एप्रिल व मे या महिन्यामध्ये माझ्या एकूण 20 ऑर्डर होत्या. मात्र एप्रिल महिन्यातील सर्व ऑर्डर रद्द केल्या आहेत.
– कैवल्य देसाई, छायाचित्रकार