Top 15 News: महाराष्ट्रात SIR चा मोठा फटका ,कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा आणि करीनाची आई-वडिलांसाठी भावनिक दिवाळी पोस्ट, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (SIR) मोहिमेत २ कोटी ६ लाखांहून अधिक मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात SIR चा मोठा फटका!
२ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली
Top 15 News: महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (SIR) मोहिमेत २ कोटी ६ लाखांहून अधिक मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. सबर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, १९० विधानसभा मतदारसंघांमध्ये वगळलेल्या मतदारांची संख्या विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा अधिक आहे. शेख, पाटील, खान, जाधव आणि पवार या आडनावांच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळल्याचे अहवालात नमूद आहे. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांत सर्वाधिक नावे वगळली गेली आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने ही नावे कायमची वगळली नसून त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. अहवालातील दाव्यांवर आयोगाने काही आक्षेपही नोंदवले आहेत.
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल!
निफाडमध्ये पारा ११.८ अंशांवर
महाराष्ट्रात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. दिवसा कडक ऊन आणि उकाडा, तर रात्री व पहाटे गुलाबी थंडी जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरातही पारा घसरला आहे. दुसरीकडे, अनेक शहरांमध्ये दिवसाचे तापमान ३३ ते ३५ अंशांवर आहे. पुढील काही दिवस हवेच्या दाबातील बदलांनुसार थंडीचा जोर कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मेडिकल पीजीच्या १,०६६ जागा वाढल्या;
एमडी-एमएस प्रवेशाची संधी वाढली!
महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी राज्यात एमडी आणि एमएसच्या १,०६६ जागा वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये सरकारी महाविद्यालयांत ७२०, तर खासगी महाविद्यालयांत ३४६ जागांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण पीजी जागांची संख्या ६,५४९ वरून ७,६१५ झाली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ही वाढ मंजूर केली आहे. जागावाढीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिक ७७ जागा वाढल्या आहेत. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातही १७ जागांची भर पडली आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
ओल्ड मंकची महाराष्ट्रात पुन्हा एंट्री? ;
पाच महिन्यांनंतर विक्रीचा मार्ग मोकळा!
महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या ‘ओल्ड मंक’च्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. बाटलीवरील लेबलमध्ये बदल करण्यास कंपनीने सहमती दर्शवली असून मुंबई उच्च न्यायालयातील याचिकाही मागे घेतली आहे. FSSAI ने उत्पादनातील घटक आणि लेबलवरील दाव्यांवर आक्षेप घेतल्याने मे-जून २०२६ पासून विक्री थांबवण्यात आली होती. आता कंपनी नवीन लेबलसह उत्पादन बाजारात आणणार आहे. मात्र, नव्या लेबलला FSSAI ची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विक्री नेमकी कधी सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत खलबते;
चेतन नरके की अंबरिश घाटगे, कोणाला संधी?
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. कोल्हापुरात झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदाचा उमेदवार आणि शासननियुक्त संचालकांच्या नावांवर चर्चा झाली. १० नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवड होणार आहे. भाजपकडून डॉ. चेतन नरके यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यांना विरोध झाल्यास अंबरिश घाटगे यांना संधी मिळू शकते. दरम्यान, शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधातील याचिकांवर ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे महायुतीने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी;
‘नंदनवन’मध्ये स्नेहमेळावा Top 15 News:
मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दिव्यांगांसोबत फराळ करत भेटवस्तू दिल्या आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या माणसांच्या आयुष्यात आशेचा दिवा लावणे म्हणजे खरी दिवाळी, असे ते म्हणाले. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि जिल्हा नियोजन निधीतील एक टक्का निधी खर्च करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यातील आनंद आश्रमात दीड हजारांहून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले असून हा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरपंच महिलेचा फडणवीसांकडे थेट आग्रह;
OC देण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर त्यांनी स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधत गावांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भिष्णूर गावच्या सरपंच लता बागडे यांनी तलावाच्या खोलीकरणासह विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. तसेच दिलेल्या निवेदनाची पोचपावती अर्थात ओसी देण्याची मागणी केली. यावर फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पोचपावती देण्याचे निर्देश दिले. तसेच गावाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतल्याबद्दल लता बागडे यांच्या जागरूकतेचे कौतुक केले.
निलंगेकरांचा देशमुखांना इशारा;
म्हणाले, ‘निवडणुकीनंतर उत्तर देईन!’
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुखांना नाव न घेता इशारा दिला आहे. ‘तुमचा कामावर विश्वास असता, तर घोडेबाजार केला नसता. तुम्ही लोकशाहीचा खून करणारे आहात,’ असा आरोप त्यांनी केला. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि संभ्रम निर्माण करू नका, असेही निलंगेकर म्हणाले. ‘निवडणूक झाल्यानंतर असं उत्तर देईन की तुम्हाला बोलण्याचीही हिंमत होणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीप्रणीत छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनेलच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मजुरांच्या पालावर दिवाळीचा फराळ!
मेघना साकोरे-बोर्डीकरांची अनोखी दिवाळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील ऊसतोड मजुरांसोबत दिवाळी साजरी केली. मजुरांच्या पालावर जाऊन त्यांनी दिवाळीचा फराळ केला आणि कष्टकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १६८ कोटी रुपयांपेक्षा अधिक दिवाळी अग्रिम मदत जमा करण्यात आली आहे. या मदतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना सण साजरा करण्यासाठी आर्थिक आधार मिळाला आहे.
दिवाळीचा सण, पण बळीराजा शेतातच!
कोकणात भात झोडणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना कोकणातील शेतकरी मात्र शेतात राबताना दिसत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे भात कापणी आणि झोडणीच्या कामांचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे सणाच्या दिवसांतही शेतकऱ्यांना शेतीची कामे करावी लागत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणारी कामे संध्याकाळपर्यंत सुरू राहत आहेत. शेतातच फराळाचे पदार्थ खाऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. कोकणातील सुमारे ७० टक्के शेतकरी सध्या भात झोडणी आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा!
१३७ औषधांच्या किमती ९६ टक्क्यांपर्यंत घटणार Top 15 News:
केंद्र सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्करोगावरील १३७ औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या असून, नवीन दर ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने औषधांवरील व्यापारी नफा निश्चित केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रुग्णांची दरवर्षी सुमारे ३,५०२ कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे. जवळपास ६०० ब्रँडच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक कपात झाली असून, सर्वाधिक कपात ९६.४५ टक्के आहे. काही औषधांच्या किमती ४० हजारांवरून थेट २ ते ३ हजार रुपयांपर्यंत आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने २४ टक्क्यांनी स्वस्त,
भारतात मात्र २० टक्केच घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी ५,३७९ डॉलर प्रति औंसवर पोहोचलेले सोने शुक्रवारी ४,०६८.७१ डॉलरवर आले. म्हणजेच सुमारे २४ टक्के घसरण झाली. मात्र, भारतीय बाजारात सोन्याचे दर सुमारे २० टक्क्यांनीच कमी झाले आहेत. यामागे केंद्र सरकारचे आयात शुल्क धोरण आणि रुपयातील घसरण ही प्रमुख कारणे आहेत. भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात होते. त्यामुळे आयात शुल्क वाढल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारात मर्यादित राहिला.
अमेरिकेत दिवाळी कार्यक्रमात हिंदूविरोधी घोषणाबाजी;
ट्रम्प समर्थकाच्या कृत्याने संताप
अमेरिकेतील सिएटलमध्ये दिवाळी कार्यक्रमादरम्यान हिंदू आणि भारतीयांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ट्रम्प समर्थक जॅक लँग आणि त्याचे साथीदार हातात द्वेषपूर्ण संदेश असलेले फलक घेऊन कार्यक्रमात पोहोचले. त्यावेळी मुले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होती. उपस्थितांनी निषेध करत आंदोलकांना बाहेर काढले. भारतीय-अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान, हिंदू संघटना CoHNA नेही चिंता व्यक्त केली असून, परिसरातील हिंदूंना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांनी अन्य दिवाळी कार्यक्रमांमध्येही आंदोलन करण्याची धमकी दिल्याचा संघटनेचा दावा आहे.
मार्नस लॅबुशेनला ऑस्ट्रेलियन संघातून डच्चू!
१७ महिन्यांत दुसऱ्यांदा मोठा निर्णय
खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज मार्नस लॅबुशेनला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी याला दुजोरा दिला. गेल्या १७ महिन्यांत दुसऱ्यांदा त्याला संघाबाहेर बसावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. आता तो शेफिल्ड शील्ड स्पर्धेत क्वीन्सलँडकडून खेळणार असून कर्णधारपदही सांभाळणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी त्याच्याकडे असेल. भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकांसाठी त्याचे संघाचे दरवाजे खुले असल्याचे बेली यांनी स्पष्ट केले.
‘आई-बाबांशिवाय कुठे जायचं?’;
करीनाची आई-वडिलांसाठी भावनिक दिवाळी पोस्ट! Top 15 News:
अभिनेत्री करीना कपूरने दिवाळीनिमित्त आई-वडील रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोठी बहीण करिश्मा कपूरही या फोटोंमध्ये दिसत आहे. ‘आई-बाबांशिवाय कुठे जायचं?’ असं भावनिक कॅप्शन देत करीनाने आई-वडिलांवरील प्रेम व्यक्त केलं. माध्यमांच्या वृत्तानुसार, करिश्माच्या ऑफिसमधील लक्ष्मीपूजेनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. या फोटोंमध्ये करीनाचा मुलगा जेह आजोबा रणधीर कपूर यांना मिठी मारताना दिसत आहे. करीनाचा हिरवा ड्रेस आणि करिश्माचा पारंपरिक लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.





