करोनाग्रस्त नवजात बालकाचा मृत्यू; सहा दिवसांपासून सुरू असलेली झुंज अपयशी!

नाशिक/पालघर – पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी एका नवजात बालकाला करोनाची लागण झाली होती. दुर्देवाने या बालकाचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र अखेर त्याची झुंज अपयशी ठरली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. करोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत.
पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. हे बाळ जन्माला आल्यानंतर 12 तासाने त्याची करोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले.
त्यामुळे त्याला चांगल्या उपचारासाठी पालघरमधील एका रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांना तत्काळ पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. मात्र तिथेही योग्य सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यात बाळाची प्रकृती खालावत गेली.
जव्हारमध्येही वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी 6 दिवसांच्या बाळाने अखेरचा श्वास घेतला.





