शेअर बाजारात 9 टक्क्यांची घसरण : जनरल मोटर्स, ऍपलने काम थांबवले
वुहान : कोरोना विषाणूमुळे चीनमध्येच नाही तर जगभरात याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसणार आहे. आज सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच चीनच्या शेअर बाजारात 9 टक्क्यांनी घसरण झाली. नववर्षासाठी चीनमध्ये 23 जानेवारीपासून शेअर बाजार बंद होता.
सोमवारी सकाळच्या सत्रात पडझडीने व्यवहाराला सुरुवात झाली. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक देशांनी चीन बरोबर व्यापार कमी केला आहे. अनेक विमान कंपन्यांनी चीनमध्ये उड्डाणे बंद केली आहेत. जनरल मोटर्स, ऍपल, स्टारबक्स या जगविख्यात कंपन्यांनी चीनमधील आपले काम तूर्तास बंद केले आहे.
कोरोनाविषाणूमुळे फक्त चीनच नाही अन्य देशांच्या शेअर बाजारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हजारपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे.
कोरोना विषाणूचे मुख्य केंद्र असलेल्या वुहानसह अन्य शहरे पूर्णपणे बंद आहेत. चीनच्या प्रशासनाने 10 फेब्रुवारीपर्यंत सुट्टया वाढवल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.