Corona Vaccination: 12 ते 14 वयोगटातील मुलांना 16 मार्चपासून करोनाची लस

नवी दिल्ली – 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. मांडविया म्हणाले, 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण सुरू होत आहे. मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे. तसेच, 60हून वयोगटातील सर्व लोकांना आता खबरदारीचे डोस मिळू शकतील. मुलांचे कुटुंबीय आणि 60हून अधिक वयोगटातील लोकांना विनंती करतो की त्यांनी लस अवश्य घ्यावी, असे मांडविया यांनी म्हंटले आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री म्हणाले होते की, देशातील 15 ते 18 वयोगटातील तीन कोटींहून अधिक किशोरवयीन मुलांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण झाले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पुढील स्तरावर घेऊन जात आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 30 दशलक्षाहून अधिक किशोरांना कोविड-19 विरुद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2503 नवे रुग्ण आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड प्रकरणांमध्ये 19.6 टक्के घट झाली आहे. आतापर्यंत कोरोनाचे एकूण 42,993,494 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचे तर त्यांची संख्या 36,168 आहे. गेल्या 24 तासांत 4,377 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 42,441,449 लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 515,877 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 4,61,318 लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 1,80,19,45,779 लोकांचे लसीकरन पूर्ण झाले आहे.





