Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र! संजय राऊतांनी केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक म्हणाले “ते स्वतःला कट्टर रामभक्त…”
Sanjay Raut : या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'रामरक्षा' या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार राजकीय शाब्दिक चकमक रंगली होती.

Sanjay Raut : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष पत्र पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी फडणवीस यांना ठाकरे सेनेच्या ‘रामरक्षा आंदोलनात’ सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर असून, १८ जुलै रोजी राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरे सेनेतर्फे ‘रामरक्षा आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘रामरक्षा’ या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार राजकीय शाब्दिक चकमक रंगली होती. आता राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्याने या घडामोडींना नवे राजकीय वळण मिळाले आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आंदोलनस्थळापासून अगदी जवळ आहे. ते स्वतःला कट्टर रामभक्त मानतात आणि अयोध्येतील कारसेवेतही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांनी रामभक्त म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
प्रिय देवेंद्रजी अवश्य यावे
आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत,
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/92VdPbhByu— Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2026
‘देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र!’ अशा शब्दांत पत्राची सुरुवात करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘रामरक्षा आंदोलनात’ सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलयं?
पत्रात राऊत यांनी म्हटले आहे, “आपण स्वतःला प्रखर रामभक्त आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणता. अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात आपण सहभागी झाल्याचेही अनेकदा सांगितले आहे. आपल्यासारख्या लाखो रामभक्तांच्या संघर्षातून रामजन्मभूमी मुक्त झाली आणि श्रीराम मंदिर उभे राहिले.”
पुढे ते म्हणतात, “याच राम मंदिरात चोरी, आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीसारखे गंभीर प्रकार समोर आले आहेत. शेकडो कोटी रुपयांच्या अपहाराचे आरोप होत असून, या प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही दुःख व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिरातील कथित गैरव्यवहारांविरोधात जनजागृती करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ‘रामरक्षा’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘रामरक्षा’ म्हणजे श्रीरामाच्या मूल्यांचे आणि श्रद्धेचे संरक्षण, हे समजून घ्यावे.”
या पत्राच्या शेवटी राऊत यांनी फडणवीस यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत म्हटले आहे, “हा कार्यक्रम नागपुरात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. आपण रामभक्त म्हणून या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे आणि उपस्थित रामभक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती.”
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा आंदोलन
अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईनंतर आता उद्धव सेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी १८ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये सायंकाळी ४ वाजता राममंदिर, रामनगर येथे रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे.
World Snake Day: भारतातील ‘बिग 4’ विषारी साप कोणते? सर्वाधिक मृत्यू यांच्याच दंशामुळे






