सेऊल : चीननंतर आता दक्षिण कोरियामध्ये करोनाचा तांडव सुरूच असल्याचे दिसत आहे. इथे एकाच दिवसात करोनाच्या 6.21 लाख नव्या रुग्णांची धक्कादायक नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृतांच्याही आकड्यात वाढ होत असून गुरुवारी ती 429 इतकी झाली आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
कोरियामध्ये वाढलेल्या या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगितले जाते. दक्षिण कोरियात गेल्या तीन दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी कोरियात 3.62 लाख रुग्ण, बुधवारी 4 लाख तर गुरुवारी तब्बल 6.21 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या दरम्यान मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. दक्षिण कोरियातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 82 लाख 50 हजार 592 इतकी झाली आहे.
दक्षिण कोरियात पसरणाऱ्या या रुग्णसंख्येला स्थानिक पातळीवरील झालेला प्रादुर्भाव कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दक्षिण कोरियातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना करोनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सहापेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कंपन्यांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये 293 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. चीननंतर आता दक्षिण कोरियातही करोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणाने उदयास आलेल्या करोनाच्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.