Corona : मध्यरात्री ऑक्सिजन संपला अन् तेरा रुग्णांची झुंज थांबली; चार दिवसांत ७५ मृत्यू

पणजी – गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आजही मध्यरात्र ते पहाटेच्या सुमाराला आणखी तेरा रुग्ण दगावल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत तेथे कोविडचे एकूण 75 रुग्ण दगावल्याने हे गंभीर प्रकरण बनले आहे. सगळे मृत्यू मध्यरात्रीच्या वेळेलाच झाले आहेत. तेथे ऑक्सिजनच्या अभावाने हा प्रकार घडत असल्याचे सांगितले जात असले तरी सरकारने मात्र अजून त्या विषयीची स्थिती स्पष्ट केलेली नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठापुढे या डॉक ऑवर्स मृत्यूच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यातील एका सुनावणीच्यावेळी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काही लॉजिस्टिक ईश्यु आहेत असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मध्यरात्री 2 ते सकाळी 6 या अवधीतच हे सारे मृत्यू झाल्याने त्याविषयीचे गूढ आणखीनच वाढले आहे. 26 रुग्ण मंगळवारी दगावले, 21 रुग्ण बुधवारी दगावले, 15 जण गुरुवारी दगावले तर आज शुक्रवारी 13 जण दगावले आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी सरकारने हायकोर्टात सांगितले की रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला परंतु तेथे प्रेशरची समस्या उद्भवली होती.
ऑक्सिजन पुरवठ्याच्या संबंधात ज्या काही समस्या असतील त्या समस्या त्वरित दूर करा असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. हे सरकारी व्यवस्थेतील रुग्णालय आहे. एका विशिष्ट वेळी तब्बल 75 रुग्णांचा जीव जाणे ही देशातील सर्वात गंभीर समस्या आहे. त्या विषयी सरकारकडून मात्र कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिले गेलेले नाही. विरोधी पक्षांना या अनुषंगाने भाजप सरकारवर टीकेची झोड उडवली आहे.





