आनोसेवाडीत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी आक्रमक

न्हावरे: शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी (आनोसेवाडी) परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतात बसवलेले रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केली आहे. या प्रकारामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. याप्रकरणी महावितरणचे तंत्रज्ञ लकीचंद मोरसिंग राठोड (वय २७, रा. रांजणगाव गणपती) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. ९ जानेवारी) सायंकाळी ६ ते शनिवार (दि. १० जानेवारी) सकाळी ९ च्या दरम्यान ही चोरी झाली. कळवंतवाडी, आनोसेवाडी येथील शेतगट क्रमांक ८५९ मध्ये १००/२२ के.व्ही.ए. क्षमतेचे रोहीत्र बसवण्यात आले होते. चोरट्यांनी या रोहित्राची लोखंडी प्लेट तोडून त्यातील ऑईल खाली सांडवून दिले आणि आतील सुमारे ४० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या तारांची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
तांब्याच्या तारांच्या चोरीमुळे रोहित्राचे मोठे तांत्रिक नुकसान झाले असून संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर फोडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे महावितरणच्या यंत्रणेवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या चोरीप्रकरणी रविवार (दि. ११) रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार भोते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




