Shikrapur News : मुली-महिलांच्या सुरक्षेला खाकीचे कवच; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव थेट शाळा-महाविद्यालयांच्या दारात
Shikrapur News : मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ गुन्हा घडल्यानंतर पोलिसांच्या कारवाईपुरता मर्यादित न ठेवता, गैरप्रकार घडण्याआधीच त्याला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.

Shikrapur News : मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यापुरता मर्यादित न ठेवता, गैरप्रकार घडण्यापूर्वीच त्याला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक जनजागृतीवर भर दिला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थिनींशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. (Shikrapur News)
या भेटींमध्ये विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच त्यांना महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्याधाम प्रशाला शिक्रापूर, जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप, सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर, न्यू इंग्लिश स्कूल धामारी, सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालय कासारी आणि शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक येथे विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच, छेडछाड, पाठलाग, अश्लील शेरेबाजी, धमकी, सोशल मीडियावरून होणारा त्रास, अनोळखी व्यक्तींशी संपर्क तसेच बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देण्यात आली. (Shikrapur News)
एखाद्या मुलीचा पाठलाग केला जात असेल, वारंवार त्रास दिला जात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील संदेश, फोटो अथवा धमक्या दिल्या जात असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, अशा सूचना पोलीस निरीक्षक यादव यांनी दिल्या. कोणताही त्रास सहन करण्याऐवजी किंवा भीतीपोटी घटना लपविण्याऐवजी पालक, शिक्षक अथवा पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले आणि हनुमंत गिरी यांनीही महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती केली. मुली व महिलांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Shikrapur News)
सार्वजनिक ठिकाणी अथवा सोशल मीडियावर गैरप्रकार, संशयास्पद हालचाली किंवा मुलींना त्रास देण्याच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी गप्प न बसता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. (Shikrapur News)
मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिक…
मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करू नये किंवा भीतीपोटी तो लपवू नये. शाळा, महाविद्यालय, रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर कोणी त्रास देत असेल, तर पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांनीही गैरप्रकार निदर्शनास आल्यास गप्प न बसता पोलिसांना माहिती द्यावी.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे





