Satara: ‘शाहू सृष्टी’तून साताऱ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा
Satara ‘शाहू सृष्टी’ हा केवळ पर्यटन प्रकल्प न राहता साताऱ्याचा इतिहास समजून घेण्याचे महत्त्वाचे केंद्र ठरावे, या दृष्टिकोनातून संस्थेने निवेदनात विविध बाबी मांडल्या आहेत.

Satara: छत्रपती शाहू महाराजांचे कार्य, मराठा साम्राज्याचा इतिहास आणि साताऱ्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या प्रस्तावित ‘शाहू सृष्टी’ प्रकल्पाच्या उभारणीसाठी दख्खन इतिहास संशोधन संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्यावतीने विविध अभ्यासपूर्ण सूचना व प्रस्तावांचा समावेश असलेले सविस्तर निवेदन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सादर करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर उपस्थित होते.
‘शाहू सृष्टी’ हा केवळ पर्यटन प्रकल्प न राहता साताऱ्याचा इतिहास समजून घेण्याचे महत्त्वाचे केंद्र ठरावे, या दृष्टिकोनातून संस्थेने निवेदनात विविध बाबी मांडल्या आहेत. ऐतिहासिक घटनांचे दस्तऐवजीकरण, तत्कालीन वास्तू, व्यक्ती, शस्त्रे, नाणी, साहित्य आणि मराठा इतिहासाशी संबंधित संदर्भ यांचे शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण करण्याची आवश्यकता संस्थेने अधोरेखित केली. संस्थेचे अध्यक्ष मुकुंद पायगुडे व उपाध्यक्ष रमेश चंदनकर यांनी संस्थेच्या इतिहास संशोधन कार्याची माहिती मोहिते यांना दिली. माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या सहकार्याने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोहिते व राजेशिर्के यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अजय घोरपडे, आशिष संकपाळ, अमोल भोसले, प्रवीण साळुंखे, मार्गदर्शक अरुणकाका पायगुडे, सचिव श्रीनिवास शिंदे, सहसचिव तथा विश्वस्त योगेश खोपडे, विश्वस्त नरेश निगडे, ऋषिकेश पासलकर व ओंकार ढमाले उपस्थित होते. निवेदनाच्या निर्मितीत निखिल भापकर यांनी योगदान दिले. यानंतर संस्थेच्या सदस्यांनी इतिहासप्रेमी व नाणी- शस्त्र संग्राहक आशिष संकपाळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या संग्रहाची पाहणी केली.
शाहू महाराजांचा इतिहास ‘दृश्य’ स्वरूपात येणे गरजेचे
साताऱ्याच्या इतिहासाची ओळख केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता नव्या पिढीला प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी ‘शाहू सृष्टी’ महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा व्यापक पट या प्रकल्पातून उलगडण्याची संधी आहे. त्याचबरोबर सातारा ही मराठा सत्तेच्या इतिहासातील महत्त्वाची भूमी असल्याने येथील राजकीय, सांस्कृतिक आणि लष्करी वारशाचे दस्तऐवजीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक पुरावे, वस्तू, नाणी, शस्त्रे, छायाचित्रे आणि संदर्भग्रंथ यांच्या माध्यमातून इतिहासाचे सादरीकरण झाल्यास स्थानिक नागरिकांसह देश- विदेशातील पर्यटकांना साताऱ्याच्या इतिहासाची अधिक सखोल ओळख होऊ शकते, अशी अपेक्षा दख्खन इतिहास संशोधन मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली .





