नवी दिल्ली –कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर केलेल्या टिप्पणीवरून वादंग निर्माण झाले. अतिशय अनादरयुक्त वक्तव्याबद्दल सोनियांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांधी परिवारावर जोरदार टीकास्त्र सोडले. संसद अधिवेशनाचा प्रारंभ राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाला. त्या अभिभाषणावर चर्चा करत सोनिया, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका संसदभवनातून बाहेर पडले. अभिभाषण नीरस वाटले का, अशी विचारणा राहुल त्यांच्या मातोश्री सोनियांना करत होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी गाठले. बिचाऱ्या महिला, राष्ट्रपती अभिभाषणाच्या अखेरीस अतिशय थकलेल्या वाटत होत्या. त्यांना अतिशय प्रयत्नपूर्वक बोलावे लागत होते, अशी प्रतिक्रिया सोनियांनी दिली. त्यावरून भाजपच्या विविध नेत्यांनी कॉंग्रेस आणि सोनियांवर टीकेची झोड उठवली. सोनियांची टिप्पणी देशातील महिला आणि आदिवासींचा अवमान करणारी आहे. विरोधकांचा सर्वोच्च घटनात्मक पदाविषयी असणारा अनादर त्यामधून अधोरेखित होतो, असे त्या नेत्यांनी म्हटले. मोदींनी दिल्लीतील भाजपच्या प्रचारसभेत बोलताना सोनियांच्या टिप्पणीवर भाष्य केले. आपण देशाचे मालक असल्याचे कॉंग्रेसजनांना वाटते. कॉंग्रेसच्या शाही (गांधी) परिवाराचा अहंकार पुन्हा उघड झाला. राष्ट्रपतींनी संसदेत अभिभाषण केले. विकसित भारतासाठीचे व्हिजन, देशाची कामगिरी यावर त्या बोलल्या. त्यांनी अतिशय प्रेरणादायी भाषण केले. मात्र, शाही परिवाराने त्या भाषणाला कंटाळवाणे म्हटले. राष्ट्रपतींचा उल्लेख गरीब, थकलेल्या असा करण्यात आला. ते उल्लेख देशातील आदिवासींचा, गरिबांचा अपमान करणारे आहेत, असा शाब्दिक हल्लाबोल मोदींनी केला. राष्ट्रपती भवनने व्यक्त केली नाराजी – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या टिप्पणीविषयी नाराजी व्यक्त करणारे निवेदन राष्ट्रपती भवनने जारी केले. संबंधित टिप्पणी राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारी असल्याने अस्वीकारार्ह आहे. अयोग्य, दुर्दैवी टिप्पणी कुठल्याही स्थितीत टाळायला हवी. हिंदीसारख्या भारतीय भाषांच्या शैलीविषयी अनभिज्ञता असल्याने काहींचा अभिभाषणाविषयी चुकीचा भ्रम झाला असावा. काही नेत्यांना वाटते त्याप्रमाणे राष्ट्रपती बिल्कूल थकलेल्या नव्हत्या. वंचित समुदाय, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे कधीच थकवणारे नसते अशी राष्ट्रपतींची भावना आहे, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले. माझी आई ७८ वर्षीय महिला… – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्या मातोश्री सोनियांच्या बचावासाठी पुढे सरसावल्या. राष्ट्रपती आणि माझी आई या दोघीही आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्या वयाने आमच्यापेक्षा मोठ्या आहेत. विशिष्ट वयात त्या आहेत. माझी आई ७८ वर्षीय महिला आहे. त्यातून तिने अतिशय स्वाभाविकपणे लांबलचक भाषणामुळे राष्ट्रपती थकल्या असण्याविषयीची भावना व्यक्त केली, असे प्रियंका यांनी म्हटले. राष्ट्रपतींविषयी माझ्या आईला पूर्ण आदर आहे. तिच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी सोनियांनी माफी मागावी अशी मागणी केल्यावरून भाजपवर जोरदार पलटवार केला. देशाची दुर्दशा केल्याबद्दल प्रथम भाजपने माफी मागावी, असे त्या म्हणाल्या. अर्थव्यवस्थेची दुर्दशा झाकण्यासाठी भाजप सोनियांच्या टिप्पणीचा विपर्यास करत आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले. नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात आले नव्हते. त्यावेळीच मोदी सरकारने त्यांचा अवमान केला होता. कॉंग्रेसचे नेते कधीच राष्ट्रपती किंवा कुठल्याही नागरिकाचा अपमान करू शकत नाहीत. ती आमची संस्कृती नाही, असे खर्गे यांनी म्हटले.