NCERT: इयत्ता आठवीच्या एनसीईआरटी सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात “न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार” या विषयावरील प्रकरण समाविष्ट केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी नव्याने बांधलेल्या पंतप्रधान कार्यालयातील ‘सेवा तीर्थ’ येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आपण मुलांना काय शिकवतो आहोत? आठवीच्या विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे? त्यावर देखरेख कोण ठेवते?” असे प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केले. शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता, “कोणाला तरी याची जबाबदारी घ्यावी लागेल,” असे मोदी यांनी ठासून सांगितले. सरकारी सूत्रांनी पंतप्रधान या प्रकरणामुळे “अत्यंत नाराज आणि संतप्त” असल्याचे सांगितले. हेही वाचा – विनोद तावडे, रामदास आठवले यांची राज्यसभेसाठी भाजपच्या यादीत आघाडी; ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सदर पाठ्यपुस्तकाच्या पुढील मुद्रण, प्रकाशन तसेच डिजिटल प्रसारावर संपूर्ण बंदी घातली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोळी यांच्या खंडपीठाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव व एनसीईआरटीच्या संचालकांना न्यायालय अवमान कायद्यांतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे.