Uddhav Thackeray : मराठी भाषेवरून वाद: प्रताप सरनाईकांच्या विधानावर उद्धव ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेवरून पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला आहे. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झाली आहे, असं विधान केलं आहे. सरनाईक यांच्या या विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र आक्षेप घेत ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांना धारेवर धरलं आहे.
मराठीच्या छाताडावर उपऱ्यांना बसविण्याची सूट मिळाली आहे काय? याचे आधी उत्तर द्या. महाराष्ट्राची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे व त्यातील साधारण नऊ कोटी लोक मराठी बोलतात. मराठीत व्यवहार करतात. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत भाषा आहे व येथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असा कायदा असल्याचे ‘एसंशिं’ गटाच्या मंत्र्यांना माहीत नाही काय?” असा सवाल ठाकरे गटानं अग्रलेखात उपस्थित केला आहे.
मराठीच्या छाताडावर उपऱ्यांना बसविण्याची सूट मिळाली आहे काय?” महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे आणि येथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी केलेल्या संघर्षावर ‘दारूच्या गुळण्या’ टाकण्याचे काम चालले आहे, असा आरोप ठाकरे गटाने सामनातून केला आहे.
प्रताप सरनाईक यांची भूमिका
विवाद वाढल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मराठी ही आमची मातृभाषा असून तिचा सन्मान करणे हेच आमचे कर्तव्य आहे. भाषांतरातून गैरसमज निर्माण झाला होता आणि आम्ही कधीही मराठीची अवहेलना केली नाही. आम्ही हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचा आदर करतो, पण मराठी हीच आमची प्राथमिकता आहे, अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेवर प्रेमाचा वर्षाव करताच त्यांच्या मदतीस भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे धावून आले., ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिलाय हे विसरू नका,’’ असं बावनकुळे म्हणाले. त्यावर हा दर्जा दिला म्हणून तुमच्या मंत्र्यांना मराठी भाषेचा असा अपमान करण्याचा परवाना मिळाला आहे काय?” असा सवाल सामना अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
राजकीय पडसाद
या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठी भाषेच्या सन्मानासाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तर प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मराठी भाषेच्या बाबतीत आपला आदर असल्याचे नमूद केले आहे.




