Pimpri : पवना धरणातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी : पवना धरण ७२ टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पवना धरण व्यवस्थापनाने शनिवार (दि. ५) पासून पवना नदी पात्रात नियंत्रित पद्धतीने विसर्ग सुरू केला आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून सांडव्याद्वारे ४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून, हा विसर्ग १५ जुलै २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाऊ शकते, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच शेती अवजारे, पाण्याचे पंप, जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे प्रशासनाने सांगितले आहे. सखल भागातील रहिवाशांना सावध करण्याच्या सूचनाही स्थानिक यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. जलसंपदा विभाग व प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन करत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
दरवर्षी साधारणतः १५ ऑगस्टच्या आसपास पवना धरण १०० टक्के भरते. त्यामुळे ऑगस्टच्या पाहिल्या आठवड्यापासून पवना धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. मात्र यंदा प्रथमच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.





