कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी शासनाकडून कंत्राट नोकरभरती

राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा आरोप : शिरूर तहसीलदारांना निवेदन
रांजणगाव गणपती – कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी शासनाने कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरु करण्यासाठी खटाटोप चालला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल अरुण गायकवाड यांनी केला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन शिरूर व शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. युवकांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याच्या विरोधात कंत्राटी सरकारच्या कंत्राटी जीआर ची होळी करण्यात आली.
राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मूळात असंवैधानिक आहे.
एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.
तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष शिरूर मुज्जाफर कुरेशी, शिरूर महिला शहराध्यक्षा संगीता शेवाळे, शिरूरचे माजी नगरसेवक ऍड. अशोक पवार, युवती अध्यक्षा शिरुर तज्ञीका कर्डिले, रवींद्र खांडरे, विजय ढोबळे, सागर नरवडे, राहिल शेख, हाफीस बागबान, अमोल चव्हाण, तेजस माने, हर्षद शेख, सागर ओव्हाळ, ऋतिक ढोबळे, अंकुश कांबळे, तुषार माने, सुमित गायकवाड, निलेश गायकवाड, ओंकार गायकवाड, संदीप रोडे आदी उपस्थित होते.





