पुणे | स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन कायम ठेवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील विविध सामाजिक, कामगार संघटनांसह राजकीय पक्षांकडून विविध भागात स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महावितरणकडून दोन दिवसांपूर्वी सामान्य ग्राहकांकडे हे मीटर लागणार नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु, या योजनेबाबत अधिकृत तपशीलवार निर्णय उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी आंदोलन कायम ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे.
महावितरण कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून सामान्य ग्राहकांकडे हे मीटर लागणार नसल्याची घोषणा केली. परंतु, अधिकृतपणे व तपशीलवार निर्णय नेमका काय घेतला, याची कुणालाही माहिती उपलब्ध नाही.
त्यामुळे सध्यस्थितीत ही केवळ घोषणाच दिसत आहे. त्यामुळे दि. २ जुलैला होणारे आंदोलन व अधिकृत निर्णय जाहीर करावा यासाठीच्या मागण्या कार्यक्रम आंदोलनातून सातत्याने चालू ठेवणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने टेंडर्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही. महावितरण कार्यालयातून याबाबत अधिकृतरीत्या कोणीही काहीच सांगत नाही.
केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून अशी वक्तव्ये होत आहेत. त्यामुळे या घोषणा व ही वक्तव्ये म्हणजे केवळ गाजर दाखविणे आणि तात्पुरती तोंडी स्थगिती, असा प्रकार आहे. त्यामुळे अधिकृत निर्णय होत नाही तोपर्यंत केवळ घोषणेवर कोणीही विसंबून राहू नये, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.





