विरोधकांकडून सातत्याने खोटे आरोप ;अजित पवार यांचे मांडवगणमध्ये टीकास्त्र

मांडवगण फराटा : घोडगंगा साखर कारखाना उभारणीत अनेकांचा सहभाग आहे. शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. विरोधक सातत्याने कारखान्यावर खोटे आरोप करीत आहेत. अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. योग्य कागदपत्रांच्या अभावी शेअर्स ट्रान्सफर केले तर कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. शासन स्तरावर सहकारी कारखाना सुरू करायला परवानगी नसल्याने खासगी कारखाने सुरू झाले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मांडवगण फराटा येथे घोडगंगा साखर कारखान्याच्या शेतकरी विकास पॅनलच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, शिरूर तालुक्यात साखर कारखाना नसल्याने या ठिकाणी असणारा ऊस मातीमोल भावांनी दिला जात होता. आमच्यावरच सहकारी साखर कारखाना का काढला नाही, असा आरोप होतो. कुणीही हौसेसाठी संस्थांमध्ये संचालक होत नाही. आमच्या फक्त नावावर कामे होतात. सर्वांच्या प्रयत्नांनी जिल्हा बॅंक चांगल्या स्थितीत सुरू आहे. राहुल कुल यांच्या चुकीने भीमा पाटस अडचणीत आला आहे. जिल्हा बॅंक साखर कारखान्यांना नऊ टक्के व्याजाने पैसे देते.
खासगी कारखान्यावरती ऊस नाही घालायचा मग काय करायचं. कोणतीही संस्था मजबूत नेतृत्वाखाली चालली पाहिजे ज्याच्यात कर्तृत्त्व आहे त्यालाच संधी मिळाली पाहिजे. आज इतर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील भाव पहा आम्ही एकट्याने भाव देऊन चालणार नाही. आमच्या सर्व शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. मतदान करताना जातीपाती व नातेगोते यांचा विचार करू नका.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. कारखान्यासमोर अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. तीन वर्षे भाजप सेना सरकारने वीज खरेदी केली नाही. त्याचा मोठा फटका कारखान्याचा बसला आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. साखरेला निर्यात बंदी आहे. विरोधकांनी मोदी यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजून सांगाव्यात. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, तालुकाध्यक्ष रवी काळे, सुजाता पवार, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष केशर पवार, मोनिका हरगुडे, वसंत कोरेकर, राजेंद्र नरवडे, पंडित दरेकर आदी उपस्थित होते.





