कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा अपघात, बांधकाम मजूर ठार

शिरूर- शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (इंदिरानगर) येथे ९ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडलेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातात बांधकाम मजूर हितेश इंदल शहू (वय २२, रा. नवगाव करंजीया, जि. बेमीतेरा, छत्तीसगड) याचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने हितेशचा तोल गेला आणि तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र १० जुलै रोजी पहाटे १:२१ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
हितेश हा आपल्या मित्र दिलीप रामकिसन निशाद (वय ३१) याच्यासोबत टाकळी हाजी येथे राहून बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. दिलीप यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रात दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी कुत्रा आडवा आल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून, पो.हवा. वारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या घटनेमुळे टाकळी हाजी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रोजंदारी मजुरांमध्ये शोककळा पसरली आहे. हितेशच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.




