पुणे : पुण्यातून एक धक्कादायक पारकर समोर आला आहे. यामध्ये एका बांधकाम व्यवसायीकाला वडिलांची बदनामी करण्याची धमकी देत दहा लाखाची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी त्याच्या वाहन चालकाला बिबवेवाडी पोलिसांनी खंडणी घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अमित दत्तात्रय थोपटे ( रा. गुरुदत्त अपार्टमेंट बालाजी नगर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बांधकाम व्यवसायीक गौरव प्रमोद दुगड ( रा.वसंत बाग सोसायटी, बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली होती. त्यांना आरोपी थोपटे याने मेसेज पाठवून सांगितले की तुमचे वडिल हे कोणाशीतरी जवळीक साधत आहेत. तुम्हाला बदनामी थांबवायची असेल तर त्याबदल्यात दहा लाख रुपये खंडणी द्यावी लागेल. ती न दिल्यास कुटूंबाला जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली. यानंतर खंडणीची रक्कम पुष्प मंगल कार्यालय येथे घेऊन येण्यास सांगितले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी डमी नोटा घेऊन सापळा रचला. हे पैसे घेताना थोपटेला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.