काॅंग्रेसचे परराष्ट्र धोरण सशक्त नव्हतेच! भाजप खासदाराचे विधान चर्चेत, मुंबई हल्ल्याचा दिला संदर्भ

नवी दिल्ली – विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेसने वाचणे आणि लिहिणे बंद केले आहे. गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण काँग्रेस पक्ष म्हणत होता की पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर अमेरिकेला जात आहेत. हा पाकिस्तानचा सापळा होता. आज असे समोर आले की, व्हाईट हाऊस किंवा अमेरिकन आर्मीने कधीही असीम मुनीर यांना आमंत्रित केले नाही.
मग भारताचे परराष्ट्र धोरण चुकते आहे, असे काॅंग्रेस नेते कशाच्या आधारावर म्हणतात,तासा प्रश्न भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विचारला आहे. मग पाकिस्तान मुस्लिम लीग आणि जयराम रमेश यांच्यात काय फरक आहे का, असाही प्रश्न दुबे विचारत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत आहे. अलिकडेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा केला की अमेरिकेने पाकिस्तानी लष्करप्रमुखांना त्यांच्या आर्मी डे परेडमध्ये आमंत्रित केले आहे.
यासंदर्भात काँग्रेसने भारताच्या परराष्ट्र धोरणाला पूर्णपणे अपयशी म्हटले होते. आता भाजपने काँग्रेसवर प्रत्युत्तर दिले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काँग्रेसवर टीका केली आणि पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला.
दुबे यांनी म्हटले आहे की , १९८५ मध्ये कनिष्क बॉम्बस्फोट झाला तेव्हा कॅनडाने त्याची चौकशी कधी सुरू केली? २००६ मध्ये ती सुरू झाली. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे वडील १९६८ ते १९८४ पर्यंत कॅनडाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधींनी १६ वर्षे त्यांना सात पत्रे लिहिली, पण ते त्यांच्या पत्रांना उत्तर देत नव्हते. त्यांचे कधीच ऐकत नव्हते आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत होते. असे असताना काॅंग्रेसने आम्हाला परराष्ट्र धोरण शिकवण्याची गरज नाही.
काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर पॅलेस्टाईनला पाठिंबा देत नसल्याचा आरोप केला होता आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली होती. यावर पलटवार करताना दुबे म्हणाले की, १९४८ मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन देश बनले. १९४८ मध्ये नेहरूंनी संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आणि इस्रायलला विरोध केला.
परंतु १९५० मध्ये नेहरूंनी गुप्तपणे मुंबईत इस्रायलचे व्यापार कार्यालय मिशन उघडले. १९५३ मध्ये मुंबईत इस्रायलचे कॉन्सुलेट जनरल उघडण्यात आले. १९७१ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धात आम्ही इस्रायली शस्त्रे वापरली आणि मोसादने तत्कालीन लेफ्टनंट जनरल जेकब यांच्यासोबत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखली होती.
मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?
निशिकांत दुबे म्हणाले, २००८ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतरही भारताने हल्ला केला नव्हता. त्यावेळी २००९ च्या निवडणुका होणार होत्या. शिमला करारानंतर पहिल्यांदाच जुलै २००९ मध्ये अमेरिका, सौदी अरेबिया आणि सर्व मुस्लिम देशांच्या दबावाखाली भारताने शर्म अल शेख करारावर स्वाक्षरी केली आणि पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनी भारतातील दहशतवाद आणि पाकिस्तानमधील दहशतवाद सारखाच असल्याचे मान्य केले.
काँग्रेसने दहशतवादाला पाठिंबा दिला, फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठी पाकिस्तानला पाठिंबा दिला. २०११ मध्ये शर्म अल शेख येथे दिलेल्या या विधानानंतर, पाकिस्तानने २०११ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणला ज्यामध्ये पुन्हा २६ लोक मारले गेले आणि सुमारे १०० लोक जखमी झाले. ३०० लोक जखमी झाले. काँग्रेसने इतिहासातून धडा घेण्याची गरज आहे.





