राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस काढणार पदयात्रा,जनतेपर्यंत पोहचून देणार ‘हा’ संदेश

मुंबई – कॉंग्रेस राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पदयात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. त्याशिवाय, राज्यघटना वाचवा, देश वाचवा असा संदेशही दिला जाणार आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पदयात्रांविषयीची माहिती दिली. खाद्यान्नावरील जीएसटी, अग्निपथ योजना या केंद्राच्या अयोग्य पाऊलांची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचवू. वाढत्या महागाईवरूनही केंद्र सरकारचा निषेध केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
केंद्र सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशातील ग्रामीण भागांप्रमाणेच शहरी भागांसाठीही रोजगार हमी योजना आणण्याची मागणीही त्यांनी केली.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील महाविकास आघाडी सरकार काही दिवसांपूर्वी कोसळले. त्या घडामोडीमागे भाजप असल्याचा आरोप सत्ता गमावलेल्या पक्षांकडून केला जात आहे. आता राज्यात विरोधी पक्षाची भूमिका निभावत असणाऱ्या कॉंग्रेसने केंद्र सरकार आणि भाजपला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.





