कॉंग्रेस कमलनाथ यांच्यावर सोपवणार जबाबदारी; राहुल गांधी यांनी घेतली भेट

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांची भेट घेतली. त्यामुळे कॉंग्रेस नाथ यांच्यावर पक्ष संघटनेशी संबंधित एखादी जबाबदारी सोपवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मध्यप्रदेशात वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. ती निवडणूक पक्षाने नाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी नाथ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या. अर्थात, त्या खोट्या ठरल्या. लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसच्या मध्यप्रदेशातील सुमार कामगिरीचे सत्र सुरूच राहिले.
तो पक्ष मध्यप्रदेशात खातेही उघडू शकला नाही. त्या घडामोडींमुळे नाथ यांच्यावर राहुल नाराज असल्याची कुजबूज सुरू होती. मात्र, महिनाभरापूर्वी नाथ यांनी राहुल यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल यांनी नाथ यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यातील संबंध सुरळित असल्याचे चित्र समोर आले.
महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकांच्या घोषणेच्या दिवशीच राहुल आणि नाथ यांची भेट झाली. त्यांच्यात राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे समजते. नाथ हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांना कॉंग्रेस देत असलेले महत्व राहुल यांच्या भेटीतून अधोरेखित झाले.





