Congress War Room : दिल्लीत कॉंग्रेस स्थापन करणार वॉर रूम; उमेदवारांना मिळणार मदतीचा हात

नवी दिल्ली : कॉंग्रेस आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन दिल्लीत वॉर रूम उभारणार आहे. प्रचारावेळी उमेदवारांना मदतीचा हात देण्यासाठी ती व्यवस्था केली जाणार आहे. मागील २ विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला दिल्लीत मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्या पक्षाला दोन्ही निवडणुकांत खातेही उघडता आले नाही. त्यामुळे नामुष्कीचा शिक्का पुसण्यासाठी कॉंग्रेसने यावेळी जय्यत तयारी सुरू केली आहे.
त्यातून निवडणूक जाहीर होण्याआधीच पक्षाने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. विधानसभेच्या एकूण ७० पैकी २१ जागांवरील उमेदवारांची घोषणा त्या यादीच्या माध्यमातून करण्यात आली. संबंधित उमेदवारांची बैठक दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष देवेंदर यादव यांनी घेतली. त्यामध्ये वॉर रूमविषयीची माहिती देण्यात आली. उमेदवारांची प्रचार मोहीम सुरळितपणे चालवण्यासाठी वॉर रूम हातभार लावेल.
कॉंग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादीही लवकरच जाहीर केली जाणार आहे. दिल्लीत पुन्हा राजकीय प्रभाव निर्माण करण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेसपुढे उभे आहे. त्या पक्षाला आप आणि भाजप या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात लढावे लागणार आहे.





