Tamil Nadu Cabinet : 59 वर्षांनंतर तामिळनाडू मंत्रिमंडळात काँग्रेसची एंट्री; दोन आमदार उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार
Tamil Nadu Cabinet : तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडत असून तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेस पक्ष पुन्हा राज्य मंत्रिमंडळात सहभागी होणार आहे.

Tamil Nadu Cabinet : तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडत असून तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेस पक्ष पुन्हा राज्य मंत्रिमंडळात सहभागी होणार आहे. काँग्रेसचे आमदार राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन हे गुरुवारी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन्ही आमदारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला मंजुरी दिल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. “५९ वर्षांनंतर काँग्रेस तामिळनाडू मंत्रिमंडळात सहभागी होत आहे, हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. दोन्ही नेते जनतेच्या कल्याणासाठी काम करतील,” असे त्यांनी म्हटले.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाने तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारला पाठिंबा देत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभाग घेतला. निवडणुकीनंतर काँग्रेसने द्रमुक-नेतृत्वाखालील ‘सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
किलियूर मतदारसंघातून काँग्रेसचे राजेश कुमार यांनी टीव्हीकेचे उमेदवार साबिन एस. यांचा अवघ्या १,३११ मतांनी पराभव केला होता. तर मेलूर मतदारसंघातून पी. विश्वनाथन यांनी टीव्हीकेचे ए. मदुराईवीरन यांच्यावर २,७२४ मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता.
काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, “५९ वर्षांनंतर खादीधारी काँग्रेस मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी भावनिक आणि ऐतिहासिक क्षण आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
तसेच, आघाडीतील घटक पक्षांना सत्तेत प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री विजय यांचे कौतुक केले. तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व असताना काँग्रेसचा मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेश हा पक्षासाठी महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे.





