वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस 100 हून अधिक घरे बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

वायनाड : मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला असून भूस्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून तितकेच लोक जखमी आहेत. त्याचबरोबर शेकडो लोक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट दिली व भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला.
यादरम्यान राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० हून अधिक घरेबांधून देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच केरळमध्ये यापूर्वी एकाही भागात अशी दुर्घटना घडली नसून दिल्लीतही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते सध्या वायनाडमधील मदत छावण्यांना भेट देत आहेत, जिथे तीन मोठ्या भूस्खलनामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून असंख्य घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
वायनाडमधून लोकसभेच्या उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत त्यांनी विविध शिबिरांना भेटी दिल्या आहेत. भूस्खलनात सुमारे ३५० इमारतींचे नुकसान झाले होते. खडतर भूभाग आणि अवजड उपकरणांची कमतरता यासह अनेक आव्हानांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफच्या जवानांसह १६०० बचाव कर्मचारी बचावकार्यात गुंतले होते.





