हरियाणामध्ये काँग्रेसची रणनीती; राहुल गांधींची आजपासून विजय संकल्प यात्रा सुरू

Haryana Election 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून राहुल गांधींच्या विजय संकल्प यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा अंबाला येथील नारायणगडपासून सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी कुरुक्षेत्रात पोहोचेल. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत असतील.
राहुल गांधी यांची ही निवडणूक रथयात्रा आजपासून म्हणजेच 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. राहुल गांधी सोमवारी यमुनानगर आणि अंबाला येथील काही ठिकाणी भेट देणार आहेत. यानंतर ते साहा आणि नंतर कुरुक्षेत्र जिल्ह्याला भेट देतील. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे लक्ष राज्यातील जागा जिंकण्यावर आहे. Haryana Election 2024 |
लाडवा विधानसभा मतदारसंघही याच जिल्ह्यात येतो, जिथून मुख्यमंत्री नायबसिंग सैनी निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी यांनी आतापर्यंत असंध आणि बरवाला येथे दोन सभांना संबोधित केले आहे, मात्र आता त्यांनी रॅलींऐवजी रथयात्रा करण्याचे नियोजन केले आहे, जेणेकरून प्रचार अधिक भागात करता येईल.
सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश Haryana Election 2024 |
राहुल गांधींच्या या विजय संकल्प यात्रेत या सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. यामध्ये नारायणगड, मुलाणा, रादौर, लाडवा, सधौरा, पिपली आणि कुरुक्षेत्र यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी कर्नालमधील असंध येथून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी गुरुवारी असंध आणि हिस्सारमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता.
दोन्ही काँग्रेस नेते सकाळी 10.30 वाजता नारायणगड येथील हुडा मैदानावर पोहोचतील. जाहीर सभेनंतर सकाळी 11.30 वाजता यात्रेला सुरुवात होणार असून सधौरा भागातील बिलासपूर रोड, दोसडका, साहा येथील राजीव चौक, शहााबादमधील उधमसिंह चौक, लाडवा येथील बाबैन चौक, पिपली चौक येथे यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता थानेसर येथे पोहोचून जाहीर सभेला संबोधित करतील.
पुन्हा सत्तेत येण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
राहुल थानेसर, कुरुक्षेत्र येथे जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. राहुल गांधींच्या या निवडणूक दौऱ्यात भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी सेलजा यांच्यासह राज्यातील इतर काँग्रेस नेतेही सहभागी होणार आहेत. हरियाणात १० वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
हरियाणातील बादशाहपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांना खोटे बोलणारे यंत्र म्हटले होते. काँग्रेसचे राहुलबाबा हे खोटे बोलण्याचे यंत्र आहे. कधी ते आरक्षण हटवण्याविषयी बोलतात तर कधी म्हणतात की आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणू.
भाजपचा बालेकिल्ला
थानेसर गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुरुक्षेत्र येथे रॅली घेऊन सर्वप्रथम हरियाणामध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. भाजपचा हा बालेकिल्ला फोडण्यासाठी येथे राहुल आणि प्रियांका गांधी यांची जाहीर सभा निश्चित करण्यात आली आहे.





