“बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यांनाच धोका द्यायचा…” काँग्रेसचा शिंदे गटावर निशाणा

मुंबई – शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे.त्यात अंधेरीत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपसह उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मैदानात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना होणार असला तरी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ठाकरेंना पूर्ण पाठींबा आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांचं धोका द्यायचा अशा प्रकारचं काम शिंदे गटाने केलं आहे अशी टीका लोंढे यांनी केली आहे. तुम्ही जर स्वतःला शिवसेना म्हणता,भाजप जर शिंदे गटाला खरी शिवसेना मानते मग ती तर शिंदे गटाची खरी सीट होती मग त्यांनी शिंदे गटाच्या कॅन्डीडेटला तिकीट का दिल नाही ? असा सवाल देखील लोंढे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
भाजप का लढत आहे ? ते स्पष्टपणे दिसतंय,महाराष्ट्रात बाळासाहेबाचं नाव घेऊन बाळासाहेबांना धोका देण्याचं काम सुरु आहे आणि ते लोकांना दिसतंय असंही लोंढे यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. राज्यात आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांवर या निवडणुकीचा परिणाम देखील होऊ शकतो म्हणूनच अनेक सर्वच पक्ष आपल्या पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत.





