अहमदाबाद : कॉंग्रेसचे अधिवेशन एप्रिलमध्ये निश्चित झाले आहे. पक्षाच्या अधिवेशनासाठी तब्बल ६४ वर्षांनंतर आयोजनस्थळ म्हणून गुजरातची निवड करण्यात आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन दिवसीय (८-९ एप्रिल) अधिवेशन होणार असल्याची माहिती कॉंग्रेसने रविवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यात होणाऱ्या त्या अधिवेशनाचे राजकीय महत्व अर्थातच वाढले आहे. कॉंग्रेसच्या १३९ वर्षांच्या इतिहासात गुजरातमध्ये होणारे पक्षाचे ते तिसरेच अधिवेशन ठरेल. याआधीचे अधिवेशन भावनगरमध्ये १९६१ यावर्षी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नीलम संजीव रेड्डी पक्षाचे अध्यक्ष होते. कॉंग्रेसचे गुजरातमध्ये पहिले अधिवेशन देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झाले. ते अधिवेशन १९३८ यावर्षी हरिपुरामध्ये झाले. त्या अधिवेशनात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली. आता प्रदीर्घ काळानंतर गुजरातमध्ये अधिवेशन होत असल्याने त्या राज्यातील कॉंग्रेसजनांमध्ये उत्साह संचारला आहे. अधिवेशनासाठी गुजरातची निवड केल्याबद्दल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहील यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. त्या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजपविरोधी राजकीय लढा आणखी तीव्र करण्याचे रणशिंग कॉंग्रेस फुंकणार आहे.