Nagar | चव्हाण, पटोलेंच्या काळात काॅंग्रेसच्या जागा घटल्या

शिर्डी, – मी राज्याचे नेतृत्व करत असताना काॅंग्रेस पक्षाच्या ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी ८२ जागांच्या ४२ जागा केल्या. आता नाना पटोलेंनी ४२ वरून १६ जागा आणल्या. पक्षाची एवढी दैन्यावस्था कशी झाली, याबाबत काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला दिला. काँग्रेसने आताच रडीचा डाव सुरू केला आहे. २०२९ मध्येही ते निवडूनही येणार नाही, असे दिसत. त्यामुळे त्यांनी पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडण्यास सुरवात केली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. यावेळी त्यांची कन्या नवनर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा साईमूर्ती व शाल देऊन सत्कार केला. ‘मला त्रास देणारे घरी बसले’ या आपल्याच वक्तव्यावर चव्हाण यांनी आज साईदरबारी माध्यमांशी बोलतांना खंत व्यक्त केली. मी साईबाबांचा भक्त असल्याने मला कुणावरही विनाकारण टीका करायचा उद्देश नव्हता. मात्र, मी चौदा वर्षे पक्षात वनवास भोगला, त्यामुळे मी रागाच्या भरात बोललो असेल. त्यामुळे त्यांनी मनावर घेऊ नये, राजकारणात हार-जीत होतच असते. मात्र, त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.
दोन अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर साहजिकच मनात दु:ख असते. मात्र, एकनाथ शिंदे कुठेही नाराज असल्याचे दिसत नाही. महायुतीच्या सरकार स्थापनेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, असे त्यांनी मोठ्या मनाने सांगितले आहे. संजय राऊत यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्याच्या जागा कमी झाल्या, त्याबद्दल त्यांना काय वाटतय यावर अधिक भाष्य करणे योग्य राहील. आमच्या सरकारमध्ये कोणाला कोणते मंत्री पद मिळणार, यांची चिंता त्यांनी करू नये. विरोधकांकडे राज्यसभेवर उमेदवार निवडून आणण्याइतकेही संख्याबळ नसल्याचा टोलाही चव्हाणांनी लगावला.





