Congress : कॉंग्रेसकडून बिहारमध्ये तरूणांना राज्यात नोकऱ्या पुरवण्याची मागणी करत पलायन रोको यात्रेचे आयोजन

पाटणा : कॉंग्रेसने रविवारपासून बिहारमध्ये पदयात्रा सुरू केली. पलायन रोको, नौकरी दो असे नाव त्या यात्रेला देण्यात आले आहे. बिहारमधील बेरोजगारी, उपजीविकेसाठी तरूणांचे इतरत्र स्थलांतर आदी समस्यांकडे लक्ष वेधणे हा त्यामागील उद्देश आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातून कॉंग्रेसच्या पदयात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह, प्रभारी कृष्णा अल्लवरू आणि तरूण नेते कन्हैय्या कुमार त्याप्रसंगी उपस्थित होते.
पदयात्रेसाठी युवक कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा असणाऱ्या एनएसयुआयने पुढाकार घेतला आहे. एनएसयुआयचे राष्ट्रीय प्रभारी या नात्याने पदयात्रेत कन्हैय्या महत्वाची भूमिका निभावत असल्याचे समजते. त्यांनी पदयात्रेच्या प्रारंभी पत्रकारांशी बोलताना बिहारमधील एनडीए सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. नोकऱ्या उपलब्ध करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
प्रत्येक स्पर्धा परीक्षेला पेपरफुटीने ग्रासले आहे. विविध अनियमिततांमुळे परीक्षांची प्रकरणे न्यायालयांत जातात. ज्यांना अलिकडच्या काळात नोकऱ्या मिळाल्या त्यांना निवृत्तीवेतनाच्या लाभांपासून वंचित ठेवले जात आहे. रोजगार, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयश आल्याने सत्ताधारी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विभाजनवादी राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला.
इतर राज्यांतील लोक उपजीविकेच्या शोधात बिहारमध्ये येत असल्याचे आढळत नाही. त्यामुळे बिहारी जनतेला इतरत्र मानहानीला सामोरे जावे लागते. त्या गंभीर समस्येवर सत्ताधाऱ्यांकडे कुठलाच तोडगा नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी ते द्वेषाच्या राजकारणाचा आधार घेतात. आता बिहारमध्ये परिवर्तन घडणे गरजेचे आहे. त्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यतत्पर व्हावे, असे आवाहन कन्हैय्या यांनी केले. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. ती निवडणूक विचारात घेऊन स्वत:चे अस्तित्व ठसवण्याचा प्रयत्न म्हणून कॉंग्रेसने पदयात्रा सुरू केल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.





