विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस अॅक्शन मोडवर; १६ बंडखोर उमेदवारांची केली पक्षातून हकालपट्टी

Congress Rebel Candidates | विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. तर काही नेत्यांनी बंडखोरी केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा नेत्यांवर पक्षांकडून कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांविरोधात पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेस पक्षाकडून बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या १६ उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा, शिवाजीनगर, पर्वती, गडचिरोली, भंडारा, भिवंडी, मिरा-भाईंदर, अहमदनगर शहर, कोपरी-पाचपाखाडी, यवतमाळ, राजापूर, काटोल या मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घेतली नाही. कारवाईआधी काँग्रेसने अनेक बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्यांना नोटिसही पाठवण्यात आली होती.
Congress State President Nana Patole suspends 16 rebel candidates of the Congress party for a period of 6 years. pic.twitter.com/ljacqlOVFA
— ANI (@ANI) November 10, 2024
काँग्रेसच्या वरिष्ठांनी केलेल्या मनधरणीनंतर काही बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु काही बंडखोर नेते ठाम राहिले. अखेर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या १६ बंडखोर उमेदवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. यात काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांच्यासह १६ जणांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे भाजपने सुद्धा ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोर नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे.
हेही वाचा:





