‘कोथरूडच्या पर्यावरणाचे रक्षण हे माझे कर्तव्य’; महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी केले स्पष्ट

पुणे – शहरातील टेकड्यांचे जतन करून त्या हिरव्यागार रहावे, मुळा-मुठा नदी स्वच्छ रहावी आणि शहर प्रदुषणमुक्त व्हावे यासाठी मी सैदव कटीबद्ध आहे. कोथरूडला पर्यावरणाची देण असून, ती जतन करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. पुणेकर म्हणून नेहमी पर्यावरण रक्षणासाठी मी पुढे असेल, असा विश्वास कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केला.
वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि पुणे रिव्हर्स रिव्हायल समितीचे पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी यांनी चंद्रकांत मोकाटे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कोथरूडसह पुणे शहरातील पर्यावरण, नदी सुधार योजना यासह टेकडी बचाव याबाबत चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत बधे, विकास पासलकर यासह स्वयंसेवी संस्थातर्फे प्राजक्ता महाजन, प्रिती पुष्पा प्रकाश, सुनिल काळे आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
शहराचे पर्यावरण चांगले रहावे, नद्या स्वच्छ व्हाव्यात यासह पर्यावरणसंबधीत समस्यांसाठी आम्ही उमेदवारांची भेट घेऊन प्रश्न मांडत आहे. त्या प्रश्नाला मोकाटे यांनी गांभीर्याने घेत, पर्यावरण प्रेमींनी सुरू केलेल्या चळवळीला पाठींबा देत शहराचे पर्यावरण चांगले तर जीवनमान चांगले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभा असो की विधिमंडळ अधिवेशनात पुण्यातील टेकड्या, नदी स्वच्छता यासह वाढत्या प्रदुषणावर आवाज उठविला. यापुढेही पर्यावरण रक्षणासाठी आपल्या बरोबर उभा असेल, असा विश्वास उपस्थित शिष्टमंडळाला दिला.
पुण्यातील टेकड्या हेरिटेज म्हणून जाहीर कराव्यात. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. तसेच, पुरातत्व खात्याकडे खास टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी पाठपुरावा करणार, असे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या हाती पेटती मशाल…
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या महिलांनी पेटती मशात हातात घेऊन मतदारसंघातील सुतारदरा, किष्किंधानगर परिसरात पदयात्रेला सुरवात केली. यावेळी माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदू कदम, वैशाली मराठे, अविनाश बलकवडे, दीपाली व संतोष ढोक, श्रीपाद चिकणे, नितीन पवार, डाॅ. अभिजीत मोरे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तर, आज सकाळी डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मावळे आळी भागातील पदयात्रेद्वारे संवाद साधला. यावेळी शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, नंदू घाटे, योगेश निंबरे, अजय भुवड, जगदीश दिघे, नाना पासलकर, कांता बराटे, अमित थोपटें, मारुती फेंगसे, अमोल पवार सहभागी झाले होते.





