छगन भुजबळांना काॅंग्रेसकडून ऑफर

नागपूर – महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार छगन भुजबळ मंत्रिपद न दिल्याने नाराज आहेत. माध्यमांसमोर उघडपणे ते नाराजी व्यक्त करत आहेत. अशात आता काॅंग्रेसने छगन भुजबळ यांच्या काॅंग्रेसमध्ये प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ सारख्या व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू. आता भुजबळांनी विचार करायला हवा की त्यांना कोणासोबत आणि कसे राहायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली आहे.
तसेच परभणीची घटना सुनियोजित कट होती आणि पोलिस कस्टडीमध्ये ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला ती हत्याच होती. पोलिस त्यास जबाबदार आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे.
मी गटनेता होण्याच्या शर्यतीत आहे की नाही हे मला माहीत नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय करतील त्याला मी स्वीकारेल. सभागृहात आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही मुद्दे उचलण्यासाठी सक्षम आहोत. पक्षाचे नेतृत्व संख्येने नसून विचाराने करावे लागते. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, असेही ते म्हणाले.





