Balasaheb Thackeray : शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही.! बाळासाहेबांच्या पुण्यतिथीवरून जोरदार पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेत जुंपली

Balasaheb Thackeray – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शनिवारी पुण्यतिथी होती. त्यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरे पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे पक्षात चांगलाच सामना रंगला. मुंबईत दोन्ही शिवसेनेमध्ये पोस्टर वॉर दिसून आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा आशय त्या जाहिरातीत आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे.
या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या या जाहिराती मुंबईभरात लावण्यात आल्या आहे. त्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा एक मोठा फोटो असून त्यामध्ये ते वाक्य देण्यात आले आहे.
यावरून खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. त्यांनी नेहमी इंदिरा गांधी, राजीव गांधींना राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात कायम एकोपा राहिल याची त्यांनी काळजी घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले.





