Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी धारावीला दिली भेट

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी मुंबईतील धारावी भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी चर्मोद्योगातील कामगार आणि उद्योजकांशी संवाद साधला. जगातील बड्या चर्मोद्योग केंद्रांपैकी एक म्हणून धारावीकडे पाहिले जाते. तिथे चामड्यापासून विविध प्रकारची उत्पादने बनवणारे छोटे-मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये लाखभराहून अधिक कामगार कार्यरत आहेत.
त्या कामगारांसमोरील आव्हाने जाणून घेण्यासाठी भेट दिल्याचे नंतर राहुल यांनी सोशल मीडियावरून नमूद केले. उत्पादन आणि सहभाग यांच्या माध्यमातून समृद्ध भारताची उभारणी कशाप्रकारे करता येऊ शकेल याविषयीची भावना मी याआधीच लोकसभेत व्यक्त केली. कामगारांकडे विलक्षण कौशल्य आहे. त्यांच्याकडे अनेक कल्पना आहेत. यशाची त्यांना आस आहे. मात्र, त्यांच्याकडे संधींचा अभाव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राहुल यांना कामगारांनी भेटवस्तूंच्या स्वरूपात चामड्याच्या बॅग आणि वॉलेटस् दिल्या. पुनर्विकास प्रकल्पावरूनही धारावी चर्चेत आहे. त्या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला देण्यात आले आहे. त्या प्रकल्पावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. राहुल यांनीही याआधीच त्या प्रकल्पाला विरोध दर्शवला. त्या पार्श्वभूमीवरही त्यांची धारावी भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.





