‘चीन’बरोरबरच्या स्थितीबाबत चर्चेसाठी काॅंग्रेस खासदार मनीष तिवारींनी मांडला “स्थगन प्रस्ताव’

नवी दिल्ली – चीन सीमेवरील सध्याची स्थिती आणि चीनबरोबरच्या व्यापारात भारताला होत असलेला घाटा यावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी मंगळवारी लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर केला.
चीन बरोबरच्या व्यापारात सध्या प्रचंड तूट निर्माण झाली असून सीमेवरील स्थितीही गंभीर असल्याने त्यावर लोकसभा सभागृहात बाकीचे सारे कामकात रद्द करून चर्चा केली जावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. 2019 पासून, भारत आणि चीनमध्ये सतत सीमेवर चकमकी होत आहेत. पूर्वी लडाखमधील गस्त बिंदूंवर भारतीय जवानांना प्रवेश रोखणाऱ्या चिनी सैन्याने अलीकडेच तेथील सेवा बोगद्याचे उद्घाटन ही भारतीय लष्कराला करू दिलेले नाही.
त्याच प्रमाणे सन २०२३-२४ मध्ये भारताची चीनसोबतची व्यापार तूट प्रचंड वाढली आहे. या वर्षात आपण चीनला १६.६५ अब्ज डॉलर्सची निर्यात केली पण त्याचवेळी भारताने चीनकडून १०१ अब्ज डॉलर्सची आयात केली आहे. ही तूट भयानक आहे. या संबंधात लोकसभा सभागृहात विस्तृत चर्चा व्हावी आणि सरकारने त्यावरील आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे. त्यांनी त्वरित शोध आणि बचाव उपायांचे आवाहन केले आहे.





