काँग्रेस खासदार कुमारी सेलजा हरियाणा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा हरियाणा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत त्यांची आकांक्षा उघड केली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूक काळात कॉंग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाची शर्यत तीव्र बनण्याची शक्यता आहे.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या त्या राज्यात १ ऑक्टोबरला मतदान होईल. यावेळी आपल्यासाठी पोषक वातावरण असल्याचा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. त्यातून राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आतापासूनच पक्षांतर्गत चढाओढ सुरू झाली आहे.
अशात प्रामुख्याने राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव असणाऱ्या सेलजा यांनीही त्या शर्यतीत स्वत:चे नाव नोंदवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री बनण्याची तुमची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तशी इच्छा का नसावी अशा आशयाचे उत्तर त्यांनी दिले. सर्वांनाच व्यक्तिगत आकांक्षा असतात. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्ष आणि पक्षश्रेष्ठी घेतील.
केंद्रीय राजकारणात मी प्रदीर्घ काळपासून सक्रिय आहे. आता माझी राज्यस्तरावर कार्य करण्याची इच्छा आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. विधानसभा निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर त्यांनी तशी इच्छा असल्याचे अधोरेखित केले. अर्थात, पक्षश्रेष्ठी त्यासंदर्भात निर्णय घेतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हरियाणातील कॉंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये समावेश होणाऱ्या सेलजा या गांधी परिवाराच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे त्यांनी उघड केलेली आकांक्षा हरियाणात चर्चेचा विषय बनणार आहे. त्याशिवाय, कॉंग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाच्या इतर दावेदारांची धाकधूक वाढवणारी ठरणार आहे.





