“कॉंग्रेस, डावे पक्ष केरळमध्ये प्रतिस्पर्धी.. इतरत्र बेस्ट फ्रेंडस्’; PM मोदींनी उडवली खिल्ली

थिरूवनंतपूरम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडियाचे घटक असूनही केरळमध्ये स्वतंत्रपणे लढणाऱ्या कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची खिल्ली उडवली. केरळमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे पक्ष इतरत्र बेस्ट फ्रेंडस् असल्याचे त्यांनी म्हटले.
केरळचे मुख्यमंत्री आणि डाव्या आघाडीचे नेते पिनरयी विजयन भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जातो. तर, डाव्या आघाडीचे सरकार कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करते.
मात्र, केरळबाहेर इंडिया आघाडीच्या बैठकांवेळी त्या पक्षांचे नेते एकत्र बसतात. एकत्र सामोसे, बिस्कीटं खातात अन् चहापान करतात. त्या पक्षांचे नेते केरळमध्ये एक, तर दिल्लीत दुसरेच बोलतात. त्या विश्वासघाताचे उत्तर केरळमधील जनता आगामी लोकसभा निवडणुकीत देईल, असे भाष्य मोदी यांनी केले.
भाजपच्या केरळ शाखेच्या पदयात्रा सांगतेवेळी ते बोलत होते. आगामी निवडणुकीत भाजपला केरळमध्ये दोन अंकी जागांवर विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. त्या राज्यात भाजप अद्याप राजकीय प्रभाव पाडू शकलेला नाही. कॉंग्रेस आणि डावे पक्षच तेथील प्रमुख आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत.





