कॉंग्रेसने पाटलांना सोडले वाऱ्यावर!

इंदापूरच्या कार्यकर्त्यांमध्ये सल : भाजप प्रवेशाचा हर्षवर्धन पाटलांकडे धरला आग्रह

बावडा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आजच्या घडीला कॉंग्रेसमधील एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणूनच पाहिले जात आहे. पण कॉंग्रेसच्या राज्यातील वरिष्ठांना कदाचित हे मान्य नाही. त्यामुळेच कॉंग्रेसचा राज्यातील एकही नेता पाटील यांच्या पाठीशी उभा नाही. त्यांच्या उमेदवारीसाठी राज्यातील एकही आग्रह करताना दिसत नाही. याचीच सल इंदापूरच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना बोचत असल्याने त्यांनी भाजप प्रवेश करावा असा आग्रह कार्यकर्ते करीत असले तरी “कुरघोडी’ करणाऱ्या “घड्याळा’चा “हात’ काही पाटलांना सोडवेना, असेच कार्येकर्ते व इंदापूरची जनता आता उघड उघड बोलत आहे. त्यामुळे जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह पाटील मान्य करून भाजपमध्ये जाणार की “हात’ कायम ठेवणार हे येणारा काळच सांगेल.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. पण पाटील म्हणजे इमानदारीने आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना समक्ष भेटून देत होते. कारण आघाडीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर आघाडीतून पाटलांची उमेदवारी “फिक्‍स’ होईल ही त्यांना आशा होती. आघाडी धर्म पाळण्यासाठी कार्यकर्ते तयार नसतानाही केवळ पाटलांच्या शब्दाखातर कार्यकर्ते जोमात प्रचार करत होते आणि “न भूतो न भविष्यती’ अशा प्रकारचे लीड सुप्रिया सुळे यांना मिळवून दिले. दरम्यान, आजच्या घडीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरी चालेल पण जागा सोडणार नाही असा चंगच बांधला आहे. त्यामुळे पाटील यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या. त्याचे कारणदेखील तसेच आहे, सध्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना अशी गळती लागली आहे की, कधी कोण पक्ष सोडून जाईल हे सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत इंदापूरचा आमदार असताना राष्ट्रवादी ही जागा कॉंग्रेसला देईल असे होऊच शकत नाही.

हक्‍काच्या आमदाराला नाराज करून कॉंग्रेसला जागा सोडण्याचे धाडस राष्ट्रवादी करू शकत नाही याबाबत पाटलांना चांगलीच जाण आहे. त्यामुळे ते सध्या दबाव तंत्राचा वापर करीत आहेत की, त्यांचे तळ्यातमळ्यात आहे हे आता सांगणे तरी अवघडच दिसते आहे.

  • भाजप प्रवेश केला तरी अडचणी कायम
    हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तालुक्‍यात गावोगावी सभा घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यातून आलेला कार्यकर्त्यांचा सूर व सल्ला म्हणजे पाटील यांनी भाजपा प्रवेश करून भाजपमधून विधानसभा लढवावी. यानुसार लवकरच तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये जो निर्णय कार्यकर्ते घेतील तो पाटील मान्य करणार आहेत. पण भाजप प्रवेशाने खरोखरच हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचा व विजयाचा मार्ग सुकर होईल का? कारण भाजप व सेनेने युती केल्यास इंदापुराची जागा ही पहिल्यापासून शिवसेनेची आहे; मग भाजप प्रवेश केला तरी देखील पाटलांचा उमेदवारीचा मार्ग सुकर नाही हेच खरे. त्यामुळे पाटील यांच्या मार्गातील अडचणी दिवसेंदिवस वाढतच असून त्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
  • पाटील आणि कार्यकर्तेच कमी पडले
    हर्षवर्धन पाटील यांचे व त्यांचे चुलते माजी खासदार शंकरराव पाटील यांची तालुक्‍यावर मजबूत पकड होती. पण गेल्या 15 वर्षांपासून ही पकड कमी होत गेली आणि त्याचा परिणाम गेल्या विधानसभेत त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. हा पराभव त्यांच्या व सर्वच कार्यकर्त्यांच्या अगदी जिव्हारी लागला. पण हा पराभव का झाला याची कारणे शोधून पाटील त्यावर काहीतरी तोडगा काढतील, अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते व जनता यांना होत्या. पाटलांच्या पराभवाचे खापर त्यांचे सर्वच कार्यकर्ते बारामतीकरांवर फोडत आहेत पण कुठेतरी स्वतः पाटील व त्यांचेच कार्यकर्ते कमी पडले हेही विसरून चालणार नाही.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×