उत्तरप्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन ! भाजपकडून संधिसाधू म्हणून टीकास्त्र

नवी दिल्ली – प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यासह उत्तरप्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांनी सोमवारी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच, शरयू नदीत पवित्र स्नान केले. त्यावरून भाजपकडून कॉंग्रेस नेत्यांवर संधिसाधू म्हणून टीकास्त्र सोडण्यात आले.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. त्या सोहळ्यासाठीच्या निमंत्रणाचा अस्वीकार कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी केल्याने राजकारण तापले आहे. अशात मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेशातील नेत्यांनी अयोध्येला जाण्याचा संकल्प पूर्ण केला.
मात्र, निमंत्रण नाकारल्यावरून कॉंग्रेसला लक्ष्य करणाऱ्या भाजपने रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवरही शाब्दिक तोफ डागली. कॉंग्रेस नेते पावसाळ्यात दिसणाऱ्या बेडकांसारखे आहेत. राजकारणासाठी ते काहीही करू शकतात. भगवान श्रीरामांना काल्पनिक म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना आता जाग येत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मीनाक्षी लेखी यांनी दिली.
त्या टीकेबद्दल कॉंग्रेसकडून पलटवार करण्यात आला. शुभमुहूर्त असल्याने संक्रांतीच्या दिवशी कॉंग्रेस नेत्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्या दर्शनाला राजकीय म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. तशा उल्लेखातून भाजप पाप करत आहे. खरेतर, भाजप धर्माच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करत आहे, असे कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले.





