पाटणा : वर्ष २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या राजद पक्षाने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले असेल. परंतु आतापर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम किंवा काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी त्या विषयीची कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु, काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी इंडिया आघाडीच्या मुख्यमंत्री चेहऱ्याबद्दल असे सांगितले आहे की, मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांच्याबद्दल कोणताही गोंधळ किंवा वाद नाही. मात्र मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा युतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा असेल. कन्हैया कुमार म्हणाले की, राजद हा एक मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत. राजद हा पक्ष इंडिया आघाडीला नेतृत्व प्रदान करत आहे. त्यांच्याकडे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले लोक जाणूनबुजून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या नावाकडे जनतेचे लक्ष वळवू इच्छितात. पण भाजपला संधी मिळताच, ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हटवून बिहारमध्ये आपला नेता स्थापित करतील, अशीही शक्यता आहे. कन्हैया कुमार असेही म्हणाले की, बिहारच्या लोकांना यावेळी बदल हवा आहे. त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची फसवणूक समजली आहे. जनतेला राज्यघटनेविरोधी लोक आवडत नाहीत. भाजप ऑपरेशन सिंदूरला निवडणुकीचा मुद्दा बनवत नाही; कारण त्यांना माहित आहे की, बिहारचे लोक त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देतील. त्यामुळे आगामी निवडणुकीत बिहारमध्ये सत्तांतर नक्कीच होणार आहे, अशी पुस्तीही कन्हैया कुमार यांनी जोडली.